- Activities
- Chicholi
- 24 March 2026
- 59 Less than a minute
माघ पौर्णिमा आमिस पूजेला बौद्ध समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दै. सिंहवाणी वृत्त, वाडी भारतीय बौद्ध परिषद, शांतीवन चिचोली यांच्या वतीने रविवारी आयोजित माघ पौर्णिमा आमिस पूजा कार्यक्रमास नागपूर शहरासह परिसरातील बौद्ध उपासक व उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बौद्ध धम्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८.०० ते ९.३० या वेळेत शांतीवन, चिचोली येथे हा कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध व धम्ममय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात पूज्य भंते कित्तिपोंग हेमावंसो, आंतरराष्ट्रीय रिलेशन प्रमुख, धम्माकाया फाउंडेशन, थायलंड यांनी धम्मदेशना व विशेष मार्गदर्शन केले. तसेच पूज्य भते सुमंगल सुद्धसो, धम्माकाया फाउंडेशन, थायलंड यांचेही पवित्र मार्गदर्शन उपस्थितांना लाभले.

यावेळी परित्त सुत्त पठन, वंदना, ध्यान, धम्मबोध तसेच सामूहिक सद्भावना प्रार्थना भक्तिभावाने पार पडली. शांतीवन, चिचोलीचे प्रबंधक संजय पाटील यांनी प्रकल्पाची माहिती देत, या माध्यमातून धम्मप्रसार, ध्यानसाधना व सामाजिक सद्भावना वृद्धिंगत करण्याचा निर्धार व्यक्त केला. धम्मकाया विहार, थायलंड येथील परंपरेनुसार आयोजित या आमि पूजेमुळे उपस्थित उपासक- उपासिकांना थायलंडमधील विहारासोबत लाईव्ह पूजेत सहभागी होण्याचा पुण्यलाभ मिळाला, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल बौद्ध समाजातून समाधान व्यक्त करण्यात आले असून, अशा धम्ममय उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.











